

आर्वी : रानडुकराने दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या चालकाचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शिरपूर ते टाकरखेडा रस्त्यावर झाला होता.
मारोती भगुजी शेंडे हा शिरपूर शिवारात असलेल्या शेतात रात्री आठ वाजताच्या सुमारास एम. एच. 3२ एक्स. ८७१८ क्रमांकाच्या दुचाकीने टाकरखेडा रस्त्याने जात होता. यादरम्यान समोरुन अचानक रानडुकराने दुचाकीला धडक दिली. या धडकेत मारोती रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ आर्वी येथील रुग्णालयात भरती करुन प्रथमोपचार केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.