दिवसभर फोन घेतले नाही,कुणाकुणाला उत्तर देऊ ; उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आलं आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद असल्याचं म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस…साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद”.
भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.
विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे आदी विधानसभेच्या वेळी उमेदवारी नाकारलेले किंवा पराभूत झालेले इच्छूक होते. भाजपमधील पक्षांतर्गत शीतयुद्धात खडसे, मुंडे, तावडे यांना संधी मिळू नये, असाच प्रयत्न सुरू होता. एका नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास अन्य नेत्यांवर अन्याय केल्यासारखे झाले असते. यातूनच माजी मंत्र्यांचा नावांचा विचार झाला नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
खडसे, मुंडे, तावडे यांना विधान परिषदेवर संधी दिली असती तर विरोधी पक्षनेतेपदासाठी या नेत्यांच्या नावाचा विचार करावा लागला असता किंवा त्यांनी या पदावर दावा केला असता. पक्षासाठी ते योग्य ठरले नसते. विधानसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार निश्चित करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा बाजी मारली. खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न किंवा त्यांची वक्तव्ये त्यांना भोवली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here