


हिंगणघाट : संत तुकडोजी वार्ड, म्हाडा कॉलनी येथे गेल्या एका वर्षापासून नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दररोज वणवण भटकावं लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगर परिषद हिंगणघाटच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, संबंधित प्रभागात पाणीपुरवठ्याचा कोणताही पर्यायी स्रोत उपलब्ध नाही. पाणी मिळावे यासाठी कर भरूनही नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने तत्काळ या समस्येवर उपाय योजावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, भारत ठाकरे यांच्या घराजवळील बंद बोरवेलची दुरुस्ती करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर प्रतिभा मोहाड, पूजा अबरवेले, सारिका साव, ज्योती पुसदेकर, शोभा फरकाडे, मिना श्रीरसागर, मीनाक्षी खारखाटे, सुषमा खारखाटे, शिला अबरवेले, सुमित्रा धोटे, प्रमोद पाणतावणे, लता तेलहाडे, माला येडे, आशाताई रघाटाटे, रजनी वैरागडे, सुनीता यादव, प्रमोद भोयर, वैशाली रघाटाटे, कोकिळा दिवे, अरुण बोबडे व अन्य नागरिक उपस्थित होते.