


वर्धा : गिरड पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या वर्धा पथकाने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत तब्बल ₹२ लाख ५ हजार ३०३ रुपयांचा सोन्या–चांदीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका महिला आरोपीला ताब्यात घेत चोरीचा संपूर्ण गुन्हा उघड केला आहे.
१६ ऑक्टोबर रोजी उसगाव कॉलनी, कोरा (ता. समुद्रपूर) येथील सौ. पार्वताबाई बंडूची श्रीरामे (वय ५०) या शेतमजुरीसाठी बाहेर गेल्या असताना त्यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने तोडून घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्या–चांदीचे दागिने लंपास केले होते. घटनेनंतर गिरड पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०५(अ), ३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वर्धा पथकाने हाती घेतला. गुप्त माहितीच्या आधारे संशयित महिला आरोपीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली देत घरातील पेटीतून दागिने चोरी केल्याचे सांगितले. तिच्या ताब्यातून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला —
सोन्याचा गोफ (१२ ग्रॅम) — ₹१,३५,६६०
सोन्याचे टॉप्स एक जोड (४ ग्रॅम) — ₹३३,३२०
सोन्याची डोरले एक जोड (१.७३ ग्रॅम) — ₹१४,४००
सोन्याचे मणी (४७ नग) — ₹१६,३०३
सोन्याची नथ (०.७१ ग्रॅम) — ₹५,०००
चांदीचे जोडवे एक जोड (९.९६ ग्रॅम) — ₹१,१२०
असा एकूण ₹२,०५,३०३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री. विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. महादेव सानप, पवन पन्नासे, विनोद कापसे, म.पो.हवा. पल्लवी बोबडे (स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा) यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. गुन्ह्याचा पुढील तपास गिरड पोलिस करीत आहेत.