
वर्धा : माणसाच्या आयुष्यात जसे नातेसंबंध जिव्हाळ्याचे असतात, तसेच अनेकांच्या आयुष्यात त्यांचे पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, ससा, पक्षी हेही कुटुंबातील सदस्याप्रमाणे जिवाभावाचे असतात. हे प्राणी वर्षानुवर्षे आपल्या सोबत राहतात, आपली दु:खे-सुखे सामायिक करतात. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंतिमसंस्काराची व्यवस्था नसल्याने अनेकदा प्राणिप्रेमी असहाय होतात. जागेअभावी आणि सुविधांच्या अभावामुळे मृत प्राण्यांना रस्त्याच्या कडेला किंवा ओसाड ठिकाणी टाकले जाते. ही वेदनादायी परिस्थिती बदलण्यासाठी वर्धा येथील ‘पीपल फॉर अनिमल्स’ संस्थेने एक संवेदनशील पाऊल उचलले आहे.
करुणाश्रम, पिपरी (मेघे) येथील जागेत संस्थेच्या पुढाकाराने मृत प्राण्यांसाठी सन्मानपूर्वक अंतिमसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाला ‘स्मृतिगंध’ असे नाव देण्यात आले असून, या संकल्पनेतून केवळ प्राण्यांबद्दलची करुणा नाही, तर पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला जात आहे. ‘स्मृतिगंध’ या स्थळी समाधी दिल्यानंतर त्या ठिकाणी नावफलक किंवा स्मृतीफलक ठेवण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे जिवलग प्राण्याचे स्मरण कायम राहते आणि परिसरात एक हरित, शांत वातावरणही तयार होते. या उपक्रमाचा उद्देश माणूस आणि प्राणी यांच्यातील सहजीवनाचे नाते जपणे, तसेच समाजात प्राणीमित्रतेचा संदेश पोहोचवणे हा आहे.
‘पीपल फॉर अनिमल्स वर्धा’ ही संस्था गेल्या दोन दशकांपासून प्राणीसंवर्धन, उपचार, लसीकरण आणि प्राणी-अत्याचार प्रतिबंधाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेमार्फत भटके, जखमी व आजारी प्राण्यांना उपचार आणि निवारा दिला जातो. करुणाश्रम येथील केंद्रात पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या साहाय्याने दरवर्षी शेकडो प्राण्यांचे प्राण वाचवले जातात. संस्थेने वर्धा जिल्ह्यात प्राणीकल्याण आणि पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभारली असून, ‘स्मृतिगंध’च्या माध्यमातून आता मृत प्राण्यांच्या सन्मानासाठी एक नवा अध्याय सुरू केला आहे.
या उपक्रमाला वर्धा शहर व परिसरातील प्राणिप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. काही नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांची समाधी येथे दिली असून, वृक्षारोपणाचाही संकल्प केला आहे. समाजातील इतरांनीही ही संवेदनशील कल्पना स्वीकारावी, अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. प्राण्यांच्या अंतिमसंस्कारासाठी आवश्यक माहिती, नोंदणी आणि सुविधा मिळवण्यासाठी ‘पीपल फॉर अनिमल्स वर्धा’, पिपरी (मेघे), वर्धा येथे किंवा संस्थेचे सचिव आशिष गोस्वामी यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया….
आपल्या पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा सन्मानाने अंतिम संस्कार करण्यासाठी ही जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी आपल्या प्राण्याला येथे समाधी देऊन त्याच्या स्मरणार्थ एक वृक्ष लावू शकतात. संस्थेमार्फत आवश्यक साधनसामग्री, खड्ड्याची व्यवस्था, वृक्षारोपणासाठी रोपे तसेच देखभालीसाठी सहकार्य मिळेल.
आशिष गोस्वामी, सचिव पीपल फॉर अनिमल्स वर्धा


















































