

हिंगणघाट : हिंगणघाट येथील बहुचर्चित प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणात मंगळवारी आरोपी पक्षाकडून करण्यात आलेला युक्तिवाद पूर्ण झाला असून आता फिर्यादी पक्षाला फेर युक्तिवादासाठी न्यायालयाने १५ जानेवारीला सुनावणी ठेवली आहे.
हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात मागील दोन वर्षापासून प्राध्यापिका जळीतकांडाचा खटला सुरू आहे. मंगळवारी आरोपी पक्षाचे वकील भूपेंद्र सोने यांनी आपला ५२ पानांचा लेखी युक्तिवाद न्यायाधीश राहुल भागवत यांच्यापुढे सादर केला. तसेच तोंडी युक्तिवादही पूर्ण केला. आरोपी पक्षाला आपला युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी सात दिवस लागलेत. सुरुवातीला दीड दिवस फिर्यादी पक्षाने आपला युक्तिवाद सादर केल्यानंतर २ डिसेंबरला आरोपी पक्षाने आपल्या युक्तिवादाला सुरुवात केली. २८ डिसेंबर मंगळवारपर्यंत आरोपीचे वकील भ्रूपेंद्र सोने यांनी आरोपीच्या बचावासाठी सात दिवस घेतले.
मंगळवारी सरकारी पक्षाचे वकील अँड. उज्वल निकम स्वतः आरोपी पक्षाचा युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायालयात हजर होते. त्यांनी आरोपी पक्षाच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ मागितला असता त्यांना १५ जानेवारी ही तारीख देण्यात आली. येत्या १५ जानेवारीला अँड. उज्वल निकम हे स्वतः आरोपी पक्षाला प्रत्युत्तर देतील व आपला लेखी युक्तिवाद सादर करतील. मंगळवारी न्यायालयाचे कामकाज सकाळी ११.३० ला सुरू झाले असून तब्बल अडीच तास या प्रकरणात युक्तिवाद चालला.