नगदी व सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी उघडकीस ; स्थानीय गुन्हे शाखेच्या कारवाईत २.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ! आरोपी अटकेत

वर्धा : हिंगणघाट येथील शगुन मॉलमध्ये कपडे खरेदीस गेलेल्या महिलेची बॅग व पर्स चोरून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोख माहितीच्या आधारे गजाआड केले. या कारवाईत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून तब्बल २ लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

फिर्यादी दाम्पत्य खरेदी करत असताना बॅग व पर्स मोपेडच्या पायदाणावर ठेवण्यात आली होती. अज्ञात चोरट्याने ती पळवून नेल्याने हिंगणघाट पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) भा.दं.सं. अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान ९ ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गजानन बापुराव चौधरी (वय ४४, रा. शिवाजी पार्कजवळ, हिंगणघाट) याच्या घरावर छापा टाकण्यात आला.

घरझडतीत रोख ५ हजार रुपये, सोन्याचे मंगळसूत्र (२७.८५० ग्रॅम, किमती २.०६ लाख), तसेच चांदीचे विविध दागिने मिळून एकूण २,१६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडून दागिन्यांची सराफा व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी हिंगणघाट पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here