

वर्धा : वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर आदी वन्यजीवांच्या हल्ल्यात व्यक्ती ठार झाल्यास अथवा पाळीव प्राण्यांची शिकार झाल्यास शासनाकडून २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. मात्र याच कायद्यात सुचिबद्ध असलेल्या सापाच्या दंशाने मृत्यू झाल्यास कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही, हा सरळसरळ दुजाभाव असल्याचा आरोप करत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना व पाळीव प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांनाही आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सर्प अभ्यासक व राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी केली आहे.
या संदर्भात विदर्भ सर्पमित्र मंडळ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सादर केले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व सुधारणा कायदा २००२ नुसार वाघ, बिबट, हत्ती, अस्वल आदी प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास किंवा पाळीव प्राण्यांची शिकार झाल्यास शासन तातडीने अनुदान देऊन २५ लाख रुपयांपर्यंतची मदत देते. मात्र याच कायद्यात समाविष्ट असलेल्या सापाने चावल्यास, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वा मृत पाळीव प्राण्यांच्या मालकाला कोणताही लाभ मिळत नाही.
कायदा एकच, शिक्षा एकच, पण मदतीत दुजाभाव का? असा सवाल सुरकार यांनी उपस्थित केला. मनुष्याचा मृत्यू हा वाघाच्या हल्ल्यात झाला किंवा सर्पदंशाने झाला, यात फरक कसा? दोन्ही घटनांमध्ये पीडित हा सामान्य नागरिकच असतो. मग नुकसानभरपाईचे निकष वेगळे का? अशी थेट विचारणा त्यांनी सरकारकडे केली. सरकारने शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत काही तरतुदी केल्या असल्या तरी त्या अपुऱ्या व जाचक कागदपत्रांवर अवलंबून आहेत. शेतसारा नोंद नसलेल्या व्यक्तींना तर अजिबात लाभ मिळत नाही. त्यामुळे गावोगावी ग्रामसभेतून ठराव करून सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांना २५ लाख रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी शासनाकडे पोहोचवावी लागेल, असेही सुरकार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळात महिला विभागाच्या जिल्हा कार्यवाह द्वारकाताई इमडवार, शहर प्रधान सचिव राजू तेलतुंबडे, रामभाऊ दाबेकर, मारोतराव इमडवार आदींचा समावेश होता
शेतकरी व मजुरांचा सर्वाधिक बळी
गेल्या २००० पासून सर्प अभ्यासक म्हणून काम करताना ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, वनमजूर व गोरगरीब जनता सर्पदंशाला सर्वाधिक बळी ठरत असल्याचे चित्र समोर आले, असे सुरकार यांनी नमूद केले. अनेकदा बैल, गाय, म्हैस, बकरी यांसारखे पाळीव प्राणीही सर्पदंशाने मरतात. तरीसुद्धा शासनाकडून कोणतीही मदत नाकारली जाते.