
वर्धा : दुचाकीने रस्ता ओलांडत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार (दि. 23) रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बायपास रस्त्यावर घडली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात सुजित वसंत झांबरे (वय 38, रा. बडबडी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सुजित झांबरे हे आपल्या एका मित्रासह देवळी येथील कंपनीतून काम आटोपून दुचाकी (क्र. MH 32 W 7514) ने घरी परतत होते. बायपास रस्त्यावरून रस्ता ओलांडत असताना महामार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने (MH 12 Q 6358) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी काही अंतरावर फेकली गेली. या अपघातात सुजित झांबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तस्राव अधिक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, बायपास रस्त्यावर वाढलेला वेग, आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

















































