सेलू तालुक्यात बोगस बियाणांचा मोठा साठा पकडला ; इलेक्ट्रिक पॅकिंग मशीनसह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त

वर्धा : जिल्ह्यात बोगस बियाणांचा मोठा रॅकेट उघडकीस आला असून, टाकळी झडसी (ता. सेलू) येथे कृषी विभागाने मोठी धडक कारवाई करत HTBT कापसाच्या १४६६ पॅकेटसह ११७५ किलो खुले बियाणे जप्त केले. बोगस बियाण्यांची किंमत तब्बल ५० लाखांच्या घरात असून, गुजरातमधून हे बियाणे आणून स्थानिक पातळीवर त्याचे पॅकिंग सुरू होते.

ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आली. कृषी अधिकारी, पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही माहिती मिळताच धाड टाकली. टाकळी झडसी येथील एका गोदामात बोगस बियाण्यांची पॅकिंग प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आले. तपासणीत या बियाण्यांवर कुठलाही अधिकृत ब्रँड किंवा परवाना नसल्याचे आढळले.

या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या बियाण्याचे नमुने फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बोगस बियाणे पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. शेती हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना उघडकीस आली असून, अशा बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कृषी विभाग सतर्क झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here