तलाठ्यावर सशस्त्र हल्ल्याचा प्रयत्न! माजी आमदार पुत्रासह चौघे मोकाटच; वाळू भरलेले वाहन केले होते जप्त

वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील पारडी गावात माजी आमदाराच्या पुत्राने तपासणी करत असलेल्या तलाठ्याच्या मानेवर तलवार ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसांत दाखल झाली असून आरोपी फरार असल्याची माहिती ठाणेदार संपत चव्हाण यांनी दिली.

५ ऑक्टोबर रोजी तलाठी रवींद्र वाघ हे पारडी येथे अवैध गौणखनिज उत्खननाबाबतची तपासणी करीत असताना वाळू भरलेले दोन ट्रॅक्टर त्यांना येताना दिसले. त्यांनी चालकाला वाहतूक परवान्याची विचारणा केली असता ट्रॅक्टरचालकाने परवाना नसल्याचे सांगितले. तलाठी वाघ यांनी ट्रॅक्टरचा जप्ती नामा तयार केला.

दरम्यान, काही वेळाने एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून माजी आमदार राजू तिमांडे याचा मुलागा सौरभ तिमांडे त्याच्या चार ते पाच माणसांसह आला. त्यांच्या हातात कोयता, तलवारी होत्या. सौरभ तिमांडे याने तलाठी वाघ यांच्या मानेवर तलवार ठेवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर सोडण्यास सांगून त्यांच्या समक्ष दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी तलाठी वाघ यांनी हिंगणघाट ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

माजी आमदार राजू तिमांडे याचा मुलगा सौरभ तिमांडे याच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तो गुंडगिरी प्रवृत्तीचा असून तीन ते चार प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हा देखील झालेला असल्याचे ठाणेदार संपत चव्हाण यांनी सांगितले.

दोन पथके रवाना

आरोपी सौरभ तिमांडेसह इतर चार जण ही घटना घडल्यापासून फरार आहेत. आरोपींचे शोधकार्य सुरू असून त्यांना पकडण्यासाठी दोन पथके रवाना झाली आहे. प्रत्येक पथकात एक पीएसआय आणि कर्मचारी असल्याची माहिती असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे ठाणेदार चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here