

हिंगणघाट : विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची आणि चिकित्सक विचार करण्याची वृत्ती रुजवणे आवश्यक आहे. मात्र आजही आपल्या शाळांमध्ये ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ही आज्ञाधारित संस्कृती प्रचलित आहे, जी त्यांच्या सर्वांगीण विकासास अडथळा ठरते,” असे परखड मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी व्यक्त केले. ते सातेफळ येथील ज्ञानदा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि हसत खेळत विज्ञान’ या विषयावर त्यांनी प्रभावी पद्धतीने आपले विचार मांडले.
सुरकार म्हणाले, “भारताला पाच हजार वर्षांपूर्वीच विज्ञानाची जाण होती. शून्याचा शोध, पृथ्वीच्या गतीचे ज्ञान – हे सर्व गॅलिलिओ किंवा साॅक्रेटिसच्या आधी भारतात होते. मात्र त्याचवेळी कर्मकांड, नवस-बळी, यज्ञयाग, उपवास यांसारख्या अवैज्ञानिक गोष्टी समाजात पद्धतशीर पेरल्या गेल्या. पुजारी, मुल्ला-मौलवी, पाद्री यांनी या चालीरीती रूजवून वैज्ञानिक दृष्टिकोन संपवण्याचा प्रयत्न केला. आजही प्रदीप मिश्रा सारखे ढोंगी बाबा विद्यार्थ्यांना सांगतात की, पिंडीला बेलपत्र चिकटवल्याने अभ्यास न करता परीक्षा पास होता येईल. आणि दुर्दैव म्हणजे लाखो लोक टाळ्या वाजवून याला दाद देतात. हीच अंधश्रद्धा समाजाच्या अधोगतीचे कारण आहे,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
सुरकार यांनी विद्यार्थ्यांसोबत विविध विज्ञान प्रयोगही करून दाखवले. त्यांनी साध्या रसायनांपासून तयार होणारे तथाकथित ‘चमत्कार’, हातचलाखी, दृष्टिभ्रम यांच्या माध्यमातून बुवा-बाबा कसे फसवतात याचे प्रत्यक्ष उदाहरण देऊन विद्यार्थ्यांची मने विज्ञानाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे फक्त विज्ञान विषय नाही. तो एक जीवनशैली आहे. तो माणसाला प्रश्न विचारायला शिकवतो, सत्य शोधायला भाग पाडतो. त्यामुळेच अशा दृष्टिकोनातून तयार झालेले विद्यार्थी पुढे वैज्ञानिक, राजकारणी, उद्योजक, विचारवंत म्हणून देशाला दिशा देतात,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन विद्यालयाचे प्राचार्य लकी खिलोशिया यांनी केले.