

नागपूर : जिल्ह्यात कोरोना चांगलाच आटोक्यात आला होता. दिवसाला एक, दोन किंवा तीनच रुग्ण आढळून येत होते. यामुळे नागपूरकर चांगलेच निश्चिंत झाले होते. मात्र, दोन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या दोन अंकी आकड्यावर पोहोचली आहे. ही नागपूरसाठी धोक्याची घंटा आहे. यामुळे जिल्हा तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आल्याने वेळीच निर्बंध लावणे गरजेचे झाले आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यात कडक निर्बंध लावणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोनासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीमध्ये कोविडसोबतच डेंग्यूसंदर्भातही आढावा घेण्यात आला. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मेडिकलमध्ये दोनशे खाटा कोविडसाठी राखीव ठेवल्या आहेत. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता जिल्ह्यामध्ये आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरापर्यंत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची उपलब्धता करण्यात आली आहे. असा आढावा विविध विभागामार्फत सादर करण्यात आला.
बैठकीमध्ये सार्वजनिक ठिकाणी उत्सव, सण, कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करणे अत्यावश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्ण दोन आकडी संख्येत वाढले आहेत. अशीच सुरुवात दुसऱ्या लाटेची देखील झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात जिल्ह्यात झाली आहे, असे समजून उपाययोजना करण्याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एकमत व्यक्त केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेऊन कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा, अशी सूचना नितीन राऊत यांनी केली.
सध्या रात्री दहापर्यंत हॉटेल्स सुरू आहेत. त्यावेळेत कपात करण्याबाबतचे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले. प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसांनंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधाची घोषणा केली जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे आवश्यक असून दोन लसी घेतलेल्या नागरिकांपासून सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.