व्हॅलेंटाईन डे प्रेमी युगुलांकरीता गुलाबी आणि रोमँटिक दिवस! कोणत्याही स्वार्थाविना केलेलं प्रेम हाच व्हॅलेंटाइनचा खरा अर्थ

मनिषा खोब्रागडे

वर्धा : फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्याला आणि १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. मग गुलाबाची फुलं, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू काय द्यायचा या गोंधळात तरुणाई गिफ्टशॉपमध्ये दिसतेच. खरंतर वर्षाचे ३६५ दिवस हे प्रेमाचे असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है!

हा दिवस साजरा करत असताना त्यामागचा इतिहास काय हे जाणून घेणेही गरजेचे आहे. रोम राज्यात सुमारे आठशे वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबले.

तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचे जेलरच्या मुलीवर प्रेम बसले. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून इसवी सन २६९ च्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट ‘युअर व्हॅलेंटाइन, तुझा चाहता’ असा केला. तेव्हापासूनच १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे.

वेगवेगळ्या देशात व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येकासाठी प्रेमाच्या संकल्पनाही वेगवेगळ्या असतात. एखादा मुलगा आपल्या ७० वर्षीय आजीलाही गुलाब देऊ तिला व्हॅलेंटाइन बनवू शकतो. एखाद्या आईसाठी आपल्या मुलापेक्षा कोणता प्रेमळ व्हॅलेंटाइन असू शकेल? मित्रदेखील आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो. कोणत्याही स्वार्थाविना केलेलं प्रेम हाच व्हॅलेंटाइनचा खरा अर्थ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here