ग्रामीण रुणालयात शॉर्टसर्किट! केबलने पेट घेतल्याने लागली आग; नागरिकांची सतर्कता: मोठी जीवितहानी टळली

समुद्रपूर : येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना १३ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नागरिकांच्या सत्तर्कतेने आगीवर लगेच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

समुद्रपूर शहरात नव्यानेच ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने केबलने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी आणि नागरिकांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी अग्निशमन सिलिंडरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. रुग्णालयात आग लागल्याचे समजताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला सर्व रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडले. त्या वेळेस २० ते २५ रुग्ण रुग्णालयात भरती होते. या आगीत विशेष काहीही नुकसान झाले नसले तरी नागरिकांच्या सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत आग विझविण्यासाठी धडपड केली. दरम्यान, काही वेळासाठी समुद्रपूर गावातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here