दोन दिवसांत पूर्वमोसमी पाऊस

हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच या आठवडय़ात बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांत हा पाऊस हजेरी लावणार आहे.
मध्य प्रदेशपासून तमिळनाडूपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवडय़ातही राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागातही पावसाने हजेरी लावली होती. या काळात काही भागांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारपीटही झाली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेक ठिकाणी पुन्हा कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली होती.परिणामी तापमानाचा पारा वाढत गेला.
विदर्भात सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. या ठिकाणी सर्वच भागांतील दिवसाचे तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. मराठवाडय़ातही सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर, जळगाव या ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. कोकण विभागातील मुंबई, अलिबाग, रत्नागिरी आदी भागांतील तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. पुढील दोन दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. रात्रीच्या किमान तापमानात मात्र चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

पाऊस कुठे ?

👉 हवामान विभागाच्या अंदाजानुसार ८ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे

👉 ९ मे रोजी प्रामुख्याने विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही पावसाची हजेरी असेल.

👉 १० आणि ११ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज असून, कोकण विभागातही या काळात पाऊस पडणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here