शहरातील जुन्या जीर्ण इमारतींमधून रात्री निघतो गांजाचा धूर! पोलिसांचे दुर्लक्ष; मद्यपींचा असतो ठिय्या: नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

वर्धा : शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या शासकीय इमारती सध्या जीर्ण झाल्या असून तेथील कार्यालय प्रशस्त इमारतींमध्ये स्थलांतरित झाल्याने आता त्या सर्व जुन्या जीर्ण इमारती सध्या मद्यपींचा अड्डा बनल्या आहेत. रात्रीच्या सुमारास या जीर्ण इमारतींमध्ये गांजाचा धूर निघत असून लुटपाट, चोऱयांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांत कमालीची भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्यांनाही दुसर्‍या मागार्ने जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील पोस्ट ऑफिस चौकासमोरील रस्त्यावर अपर पोलीस अधीक्षकांचे निवासस्थान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच रस्त्यावर चर्च, ज्ञानमंदिर आणि महाविद्यालये आहेत. मात्र, महाविद्यालय परिसराच्या अगदी समोरच जिल्हा कृत्रिम रेतनची जुनी इमारत आहे. ही इमारत सध्या कुलूपबंद असून हे कार्यालय प्रशस्त इमारतीत स्थलांतरित झाले आहे. मात्र, जुन्या शासकीय जीर्ण इमारतींवर सध्या मद्यपी तसेच व्यसनाधीन युवकांनी कब्जा केला आहे. रात्रीच्या सुमारास युवकांचे टोळके गांजाचे झुरके ओढण्यासाठी या इमारतींचा आसरा घेत असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नव्हेतर या मार्गाने रात्रीच्या सुमारास नागरिक तयार नसल्याचेही अनेकांनी सांगितले आहे. पूर्वी या रस्त्यावर अनेकदा नागरिकांना लूटल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.

त्यामुळे हे कार्यालय सध्या नशेडींच्या ताब्यात गेले असून याकडे मात्र, पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. इतकेच नव्हेतर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या जीर्ण इमारतीतही रात्रीच्या सुमारास अनेक जण बसून असतात. गांजा, दारु आदी अंमलीपदार्थांचे सेवन करण्यासाठी ते या जीर्ण इमारतींचा सहारा घेतात.त्यामुळे रात्रीच्या सुमारास मार्गाने गेल्यास या इमारतींतून गांजाचा धूर निघताना दिसतो. हे नागरिकांनाही दिसते. पण कुणीही तक्रार किंवा पुढाकार घेण्यास तयार नसल्याने नशेड़ींचे चांगलेच फावत चालले आहे. यामुळे तत्काळ लक्ष देण्याची मागणी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here