लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून पोलिसाच्या घरी मारला डल्ला! १.४२ लाखांचे दागिने घेऊन चोरटा पसार

वर्धा : रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन त्याच्या लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून घरातील सुमारे १ लाख ४२ हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना सिंदी मेघे परिसरातील झाडे लेआऊटमध्ये १३ रोजी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. पवन छोटेलाल यादव हे रामनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. त्यांची स्टेशन डायरीवर ड्यूटी असल्याने ते १२ रोजी ११ वाजता पोलीस ठाण्यात कर्तव्यावर गेले होते.

घरात पवन यादव यांची पत्नी पूनम, दोन मुली आणी सासू घरी होते. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन पूनम यादव यांना आवाज करायचा नाही, ओरडायचे नाही, तुमच्याकडे जे काही पैसे, सोनं असेल ते द्या, तेवढ्यातच त्याने पवन यादव यांच्या लहान मुलीला उचलून तिच्या गळ्याला चाकू लावला आणि जे घरात आहे ते दे, नाही तर तुझ्या मुलीला मारुन टाकेल, मुलीच्या जिवाच्या भीतीपोटी पूनम यादव यांनी कपाटात ठेवलेले १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचे दोन हार, सोन्याच्या तीन अंगठ्या, सोन्याची चेन, सोन्याचा झुमका, सोन्याचे कानातले, सोन्याचे मंगळसूत्र, असा एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचे दागिने काढून दिले. चोरट्याने मुलीला सोडून दागिने बॅगमध्ये भरत दुचाकीने पळ काढला.

पूनम यादव यांनी घटनेची माहिती पती पवन यादव यांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा करुन अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here