लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचा बाजार, शर्यत, जत्रा व प्रदर्शन भरविण्यावर बंदी; आजाराबाबत व्यापक जनजागृतीचे निर्देश

वर्धा : राज्यात काही जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जनावरांचा बाजार भरविणे, शर्यती लावणे, जत्रा भरविणे व प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे.

राज्यात जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आढळला आहे. जिल्ह्यात तुर्तास या रोगाचा शिरकाव झालेला नाही. परंतु अहमनगर, पुणे, अकोला, अमरावती या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात जनावरांची खरेदी विक्री होत असल्याने आजारी जनावरांसोबत संपर्क येण्याची शक्यता आहे. या माध्यमातून लम्पीचा जिल्ह्यात प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सदर उपाययोजना करण्यात आल्या आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले जातात किंवा ठेवण्यात आले आहे त्या ठिकाणापासुन अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास बंदी राहील. या प्रजातीची बाधित असलेली जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी तसेच बाधित प्राण्यांच्या संपर्कात आलेली वैरण, गवत व अन्य साहित्य, बाधित प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा यापासुन बनविलेले उत्पादने यावर जिल्ह्यात प्रवेश आणि वाहतुकीस बंदी राहणार आहे.

गुरे व म्हैसवर्गीय प्राण्यांचा बाजार भरविणे, शर्यती लावणे, जत्रा भरविणे, प्रदर्शन आयेाजित करणे आणि प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. जिल्ह्यातील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बाधित गुरे व म्हशींना आणता येणार नाही.

लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायती, नगर परिषद व नगर पंचायतींनी गोचिड, गोमाशा निर्मुलनाकरीता आपआपल्या क्षेत्रातील जनावरांच्या गोठ्यामध्ये आणि जनावरांवर दर आठवड्यातून एकदा आळीपाळीने फवारणी करावी. नागरिक आणि शेतकरी व पशुपालकांमध्ये या रोगाबाबत जनजागृती करावी. आपल्या क्षेत्रात आठवड्यातून किमान दोन वेळा व्यापक दवंडी देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व संबंधितांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here