

वर्धा : फटाके फोडल्यानंतर झालेला कचरा उचलण्यावरून झालेल्या वादात दोन कुटुंबांतील सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना बोरगाव मेघे येथील वॉर्ड ३ मध्ये घडली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबाने शहर ठाण्यात तक्रारी दिल्याने पोलिसांनी दोन्ही कुटुंबांतील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार, बोरगाव येथील रहिवासी दुबे आणि उरकुडे कुटुंब यांची घरे एकमेकाच्या बाजूला आहे. शुक्रवारी रात्री फटाके फोडल्यानंतर झालेला कचरा कोण उचलणार? यावरून शनिवारी दोन्ही कुटुंबांत वाद झाला. दरम्यान श्रद्धा सुनील दुबे, शिवकला दुबे, पिंटू जगदीश शर्मा, तसेच कोमल उरकुडे, मनीषा उरकुडे, ज्ञानेश्वर उरकुडे, रेखा मानकर, शारदा कोल्हे, छकुली कोल्हे, बंटी कोल्हे हे दोन्ही कुटुंब आमने सामने आली आणि एकमेकांना शिवीगाळ करू लागले.
पाहता पाहता दोन्ही कुटुंबांतील सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. काहींना किरकोळ जखमाही झाल्या. दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी सार्वजनिकस्थळी एकत्र येत हाणामारी केल्याने दोन्ही कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनुसार: सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.