भाजप आमदारांकडून सभागृहातच धमक्या : नाना पटोले

मुंबई : अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. भाजपचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरू आहे, असा संताप सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला.

सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, सभागृहाचे कामकाज सुरू असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलू लागताच भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. विधिमंडळात मध्येच बोलले म्हणून अनिल देशमुख आता आतमध्ये जात आहेत, हे मुनगंटीवार यांचे वक्तव्य धमकी देणारे आहे. सभागृहातच धमकी देण्यापर्यंत मजल भाजपची गेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ईडी, आयकर, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास देत असल्याची ही कबुलीच आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपने चालवला आहे, हे सिद्ध होते आणि लोकशाहीला हे घातक आहे, असे नाना पटोले म्हणाले.

कोरोनाच्या स्थितीचे कारण पुढे करीत पावसाळी अधिवेशन फक्त दोनच दिवसांचे ठेवल्यामुळे भाजपच्या मंडळींनी विरोधाची धार अधिक तीव्र केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय भाजपचे आमदार आज सभागृहात जरा जास्तच आक्रमक झाले. तालिका अध्यक्षांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आतमध्ये जात आहेत, असे म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी धमकीच दिली असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज सभागृहात केला. अशा धमक्या अजिबात ऐकून घेतल्या जाणार नाहीत आणि सभागृहात तर नाहीच नाही, असे पटोले यांनी ठणकावले.

१२ आमदारांचे निलंबन झाल्यानंतर भाजप नेते अधिकच चवताळले आहेत. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होऊ घातली आहे. या निवडणुकीत गोंधळ उडविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे असल्या प्रकारच्या धमक्या देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असल्याचेही पटोले यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात कोरोनामुळे अधिवेशनात कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करून कामकाज व्यवस्थित पार पाडण्यात सहकार्य केले पाहिजे. पण हे तर धमक्या द्यायला लागले. पण आम्ही या धमक्या ऐकून घेणार नाही, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here