
वर्धा : अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दिवस-रात्र वाहने धावताना दिसतात. वाळूची हीच अवैध वाहतूक पुलगाव येथील ट्रॅक्टर चालकाच्या जिवावर बेतली आहे. वाळू भरलेला भरधाव ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी हिवरा-हाडके गावाजवळ घडली.
पुरुषोत्तम भीमराव पंधरे (४७), रा. दखनी फैल, पुलगाव, असे मृत चालकाचे नाव आहे. पुरुषोत्तम हा ललित इंगळे, रा. गांधीनगर याच्या ट्रॅक्टरवर चालक होता. बुधवारी दुपारी वाळू भरलेला ट्रॅक्टर घेऊन पुलगावकडून सोरट्याकडे जात होता. भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवीत असताना वानावरील ताबा सुटल्याने हिवरा-हाडके गावाजवळ ट्रॅक्टर पलटी झाला. यात चालक पुरुषोत्तम पंधरे हा गंभीर जखमी झाल्याने मृत पावला. ट्रॅक्टर मालक ललित इंगळे याने लागलीच घटनास्थळावरील ट्रॅक्टर व वाळू उचळून पुरावा नष्ट केला. असे पोलिसांच्या लक्षात आल्याने पुलगाव पोलिसांनी मृत चालक पुरुषोत्तम पंधरे आणि मालक ललित इंगळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.