अतिवृष्टीचे पैसे वाढविण्यासाठी दिला २२ हजारांचा नजराणा! देवळी तालुक्‍यात शासकीय अनुदान वाटपाची प्रक्रिया सापडली संशयाच्या भोवऱ्यात

देवळी : तालुक्यातील एका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला त्याच्या तीन खात्यातील पैसे ८७ हजार रुपयांपर्यंत वाढवून देण्यासाठी २२ हजारांचा नजराणा मागण्यात आला. यासाठी संबंधित तलाठी व कोतवाल यांनी या शेतकऱ्यांच्या तीन खात्यावर फक्त ४३ हजार निघत असल्याची बतावणी करून त्याला वेठीस धरले. तसेच ही रक्‍कम ८७ हजार रुपयांपर्यंत वाढवून देण्यासाठी २२ हजारांचा मजराणा देण्याची गळ घालण्यात आली. त्यानुसार हा व्यवहार होऊन संबंधित शेतकऱ्यांनी १७ हजार व ५ हजार अशा दोन टप्प्यात हा नजराणा दिला.

असाच प्रकार इतर ठिकाणी सुद्धा नाकारता येत नसल्याने देवळी तालुक्यात पैसे वाटपाची प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याबाबतची माहिती तहसीलदार राजेश सरवदे यांना देण्यात आली आहे. शिवाय ही बाब देवळी व परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. देवळी नजीकच्या एका गावातील सधन शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्याकडे बागायती शेती असल्याने नुकसानीचा आकडा सुद्धा मोठाच होता. शिवाय या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे ती वेगवेगळे खाते असल्याने त्यांना शासकीय निकषाप्रमाणे आर्थिक मदत मिळणे अपेक्षित होते; परंतु गावातील तलाठी त कोतवाल यांनी सदर शेतकऱ्याला कार्यालयात बोलावून तुमच्या तीन खात्यावर फक्त ४३ हजार निघत असल्याची माहिती दिली. शिवाय ही रक्‍कम ८७ हजारांपर्यंत वाढवून देण्यासाठी २२ हजारांचा नजराणा मागण्यात आला.बँक खात्यात पैसे टाकण्याची आजचीच शेवटची तारीख असल्याची घाई करून नजराणाचे पूर्ण पैसे दोन टप्प्यात घेण्यात आले.

गरजवंताला अक्कल नसते या भूमिकेतून संबंधित शेतकऱ्यांच्या वतीने हा व्यवहार करण्यात आला. त्यामुळे याच पद्धतीचा व्यवहार इतर ठिकाणी सुद्धा नाकारता येत नसल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यातच शेतीच्या या हंगामात कोणताही माल घरी न आल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात पैशाची गरज लक्षात घेता काही ठिकाणी सातबारावरील इतर वारस न दाखविण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याची ओरड आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची अवस्था आधीच गंभीर झाली असताना त्यांना पुन्हा वेठीस पकडण्याचा प्रकार लज्ञास्पद ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here