नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर लाभ! महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

वर्धा : राज्य शासनाने सन 2017-18 ते 2019-20 या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रोत्साहनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाने 2017-18, 2018-19, व 2019-20 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमुद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये प्राथमिकदृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिध्दीसाठी बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर देखील लावण्यात आलेली आहे.या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधारकार्ड घेऊन आपल्या बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणिकरणासाठी जावयाचे आहे. त्या ठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशिल, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा करुन शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावयाचे आहे.

आधार प्रमाणिकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही शासनामार्फत करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नाही, अशा शेतकऱ्यांची नावे पुर्तता झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये निवडणुक आचारसंहित लागु आहे, अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे आचारसंहिता संपल्यानंतर यादीमध्ये समाविष्ट केली जाणार आहे, असे सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here