क्षितिजापलीकडची झेप घेण्याची जिद्द मनात बाळगा : प्रा. डॉ. पुरुषोत्तम खोब्रागडे ; गुणवंत विद्यार्थी, माजी सैनिक आणि खेळाडूंच्या सत्कार

पवनार : “आई-वडील आणि शाळेने दिलेले संस्कार हे कोणत्याही क्षणी विसरू नका. यशाच्या प्रत्येक टप्प्यावर तेच आपली खरी शक्ती ठरतात. जीवनात मोठी झेप घ्यायची असेल, तर मनात ‘क्षितिजापलीकडची जिद्द’ आणि प्रामाणिक प्रयत्नांची तयारी असावी,” असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रा. डॉ. पुरुषोत्तम खोब्रागडे यांनी केले. येथील बाबुराव बांगडे विद्यालयाच्या प्रांगणात चैतन्य स्पोर्टिंग क्लबच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, माजी सैनिक आणि खेळाडूंच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी आदिनाथ डमाळे, बांगडे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. देऊळकर सर, व्हॉलीबॉल प्रशिक्षक प्रमोद दोंदल, चैतन्य स्पोर्टिंग क्लबचे सचिव दीपक उमाटे, ॲड. पंकज मगर, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सैनिक देशाच्या सीमांवर अहोरात्र सजग राहून देशाचे रक्षण करतात पराक्रमामुळे आपण निर्धास्त जीवन जगत आहोत, असे सांगत डॉ. खोब्रागडे यांनी उपस्थित माजी सैनिकांना मानवंदना दिली. दहावी, बारावीच्या यशानंतर अनेकदा विद्यार्थ्यांना वाटते की आता सर्व काही साध्य झाले. परंतु उंच भरारी घेत असताना चुकाही होतात. त्यामुळे या वयात अधिक सावध राहण्याची गरज आहे. पालकांनी आणि शाळेने दिलेले संस्कार आपल्या वर्तनात आणि पुढील वाटचालीत नेहमी दिसले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. परिस्थितीशी कधी हार मानू नका जगात मोठी उदाहरणे आपल्या समोर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे एका सामान्य लाकूडतोड्याचा मुलगा होते. मात्र १८६१ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या जीवनातून हेच शिकायला मिळते की आपल्या आजच्या परिस्थितीने आपले भविष्य ठरत नाही; प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी हे यशाचे खरे बळ आहे,” असे उदाहरण देऊन त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला.

या प्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थी, माजी सैनिक आणि खेळाडूंना भेटवस्तू देत त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बाबुरावजी बांगडे विद्यालयाचे शिक्षक श्री. राऊत, श्री. कलोडे, श्री. चौधरी, विलास करंडे, विलास धवणे, मोरेश्वर हूलके, दिलीप वैद्य, चंदू वाघमारे, विनोद चौधरी, सतीश हिंगे आदींचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र सातपुते यांनी केले तर आभार मनीष ठाकरे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here