

वर्धा : पर्यायी पीक म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी केळी पिकाचा विचार करावा यासाठी केळीच्या विविध जातींची माहिती देण्यासोबतच मशागत ते निर्यातीपर्यंतची संपूर्ण साखळी मांडणारी डॉ. पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय केळी परिषद श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रातील केळी बागांच्या परिसरात पार पडली. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि जैन इरिगेशन सिस्टीमच्या संयुक्त वतीने आयोजित या परिषदेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला. या परिषदेत पवनार येथील केळी उत्पादक कुंदन देवराव वाघमारे यांचा केळीरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. परिषदेचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते झाले. विधान परिषद सदस्य आमदार किरण सरनाईक, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, प्रगतिशील केळी उत्पादक माजी खासदार अशोक मोहोळ प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिचीचे संचालक डॉ. आर. सेल्वराजन, आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ व जैन इरिगेशन सिस्टीमचे उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील, विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, निमगाव, सोलापूरचे संचालक डॉ. युवराज शिंदे, कृषी व जलतज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, प्रशांत भोयर यांनी प्रमुख वक्ते म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. परिषदेत केळीचे भरघोस उत्पादन घेणारे कुंदन देवराव वाघमारे यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख केळीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
२३ एकरांत २७ लाखांचे विक्रमी उत्पन्न
पवनार येथील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी तब्बल २३ एकरात केळीची तर उर्वरित चार एकरात देशी पपईची लागवड केली आहे. परिश्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकरी ४० टन केळीचे उत्पादन घेत असून २३ एकरांत २७ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. त्यांची केळीबाग पाहण्यासाठी जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात शेतकरी भेट देत असून यशोगाथा जाणून घेतात.
पारंपरिक पिकांना फाटा
सततची नापिकी, निसर्गाचे दुष्टचक्र, पारंपरिक पिकांना मिळणारा कवडीमोल भाव लक्षात घेता फळबागेकडे बळण्याचा ध्यास घेतला. यातूनच त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत परिश्रमातून २७ एकरांत केळीची बाग फुलविली.