गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा -जिल्हाधिकारी दीपक सिंगला गणेशोउत्सव साजरा करणे बाबत मार्गदर्शक सूचना जारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक सार्वजनिक ४ फूट , घरगुती २ फूट मर्यादित असावी

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली,(जिमाका),दि.14: कोविड- १९ साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षांचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
गडचिरोली निर्गमित केल्या आहेत. यामध्ये
1. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी संबंधित तालुक्यांचे तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांची यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील.
2. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
3. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फूटांच्या मर्यादेत असावी.
4. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे, मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेशमुर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षाच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरुन आगमन/विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटुंबियांचे कोरोना साथीच्या रोगापासून रक्षण होईल.
5. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा परंतु घरोघरी जाऊन वर्गणी मागणेस मनाई असेल. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती साध्या स्वरुपात प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
6. सांस्कृतिक/गर्दीचे कार्यक्रमांऐवजी सामाजिक अंतर राखून आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे उदा. रक्तदान, आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
7. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रमांना कमाल १० व्यक्तींना परवानगी असेल.
8. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
9. जमावबंदी / कलम 144 अंतर्गत आदेशाचे तंतोतंत पालन करावे.
10. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतीक दृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी.
11. कोविड-१९ अंतर्गत केंद्र शासन / राज्य शासन यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील.
12. Containment Zone मधील व्यक्तींना यामधून वगळण्यात यावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील Containment Zone मध्ये ये-जा करण्यास सक्त मनाई आहे.
13. उक्त कालावधीत गणपती मंडळाला भेटी दिलेल्या ठिकाण/कार्यालय/व्यक्ती यांची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवावी, जेणेकरुन यदाकदाचित संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोईचे होईल.
14. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच दिवसातून 3 वेळामंडप परिसराचे सॅनिटायझेशन करावे.
15. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.
16. लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलाबांची निर्मिती करण्यात यावी.
17. मिरवणुक/अन्नदान/महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमातून होणाऱ्या गर्दीला टाळण्याकरिता सदर बाबींना पूर्णत: मनाई करण्यात येत आहे.
18. या कालावधीमध्ये गणेश मंडळाबाहेर फुलांचे हार/नारळ/मिठाई/प्रसाद इत्यादी नव्याने दुकाने लावण्यास मनाई असेल.
वरीलप्रमाणे मार्गदर्शक सुचनांचे अनुपालन करण्यास सदर परिपत्रकाद्वारे सुचित करण्यात येत आहे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन/प्रशासनाकडून काही अतिरिक्त सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे सुद्धा अनुपालन करणे बंधनकारक राहील.
सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here