

वर्धा : माणुसकी म्हणजे केवळ माणसांमधील नातेसंबंध नव्हे, तर मूक प्राण्यांशी असलेली संवेदनाही आहे. पण याच माणुसकीला काळिमा फासणारी घटना वर्ध्यात उघडकीस आली आहे. एका लॅब्राडोर जातीच्या कुत्र्याच्या मागील पायाला जखम झाल्याने त्याच्या मालकाने रात्रीच्या अंधारात शहरात आणून सोडून दिलं. आपल्याच घरचा जीव एका क्षणात परका करण्यात आला.
मग कुत्रा कोणाला म्हणायचं? हा प्रश्न काल रात्री वर्धा शहरात घडलेल्या घटनेनंतर प्रत्येक संवेदनशील मनाला चटका लावणारा ठरला आहे. लाडाने पाळलेला, घराचा एक सदस्य मानला जाणारा लॅब्राडोर जातीचा कुत्रा जखमी झाला म्हणून त्याच्या मालकाने त्याला उपचाराऐवजी रस्त्यावर चुपचाप आणून सोडून दिले. प्राण्यांवरील अन्याय व माणुसकीचा काळाकुट्ट चेहरा उघड करणारी ही घटना वर्धा शहराने अनुभवली.
काल रात्री हा कुत्रा शहरातील रस्त्यावर जखमी अवस्थेत, वेदनेने विव्हळत असताना टाकून देण्यात आला. त्याच्या मागच्या भागाला झालेल्या गंभीर जखमेमुळे तो चालूही शकत नव्हता. कुणाचंही नातं, प्रेम, जबाबदारी जर अशा क्षणी सोडून जाणार असेल, तर माणूसपणाला नेमकं काय म्हणायचं? मात्र या क्षणी माणुसकी पुढे आली ती महेश गिरीपुंजे यांच्या रूपाने. त्यांनी या कुत्र्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि करुणाश्रमात दाखल केले. करुणाश्रमातील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. आज त्याची प्रकृती थोडी सुधारली आहे. जखमेतून सुटकेची लढाई लढताना त्याच्या डोळ्यातील निरागस वेदना प्रत्येकाला नि:शब्द करून गेल्या.
घरातील एखाद्या माणसाला अशी जखम झाली असती, तर त्याला रस्त्यावर टाकून दिलं असतं का? पण प्राणी बोलू शकत नाही, आपले दुख सांगू शकत नाही, म्हणून त्यांना सोपं समजून दूर सारलं जातं. हे दृश्य पाहणाऱ्यांना एकच विचार मनात येतो माणूस बोलतो म्हणून वाचतो, प्राणी गप्प राहतो म्हणून मरतो. आशिष गोस्वामी यांनी या लॅब्राडोरला पुढील जबाबदारी स्वीकारली असून योग्य उपचार व देखरेख करून त्याला पुन्हा नवजीवन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
समाजाला भावनिक आवाहन
प्राणी आपल्याशी बोलत नाहीत, पण त्यांच्या डोळ्यांतून सगळं सांगतात. ते आपल्यावर अवलंबून आहेत. त्यांना अश्यावेळी टाकून देणं म्हणजे आपल्या माणुसकीलाच गळफास देणं होय. चला, अशा घटनांना आळा घालण्यासाठी संवेदनशीलतेने पुढे येऊया, असे आवाहन संस्थेच्या कार्यकर्त्यानी केले.
प्रतिक्रिया….
फॅशन म्हणून विदेशी कुत्रे पाळू नयेत. त्यांचा सांभाळ करणे महागडे ठरते आणि जेव्हा त्यांना आजार होतात किंवा खर्च वाढतो, तेव्हा बरेच लोक त्यांना रस्त्यावर सोडून देतात. हा निर्दयी आणि गैरजबाबदारपणाचा प्रकार आहे. नागरिकांनी गावरान कुत्रे दत्तक घेतले, तर त्यांची काळजी घेणं सोपं जाईल, रस्त्यावरची भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होईल आणि अपघातांचाही धोका घटेल. प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे की पाळीव प्राणी ही जबाबदारी आहे, दिखाव्याचा भाग नाही.
आशिष गोस्वामी, सचिव, पीपल फॉर ॲनिमल्स