

आर्वी : येथील शासकीय विश्रामगृहासमोरील रोहित्राने अचानक पेट घेतला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत कुठली जीवितहानी झाली नसली तरी महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
आर्वी-तळेगाव मार्गावरील शासकीय विश्रामगृहाच्या शेजारील रोहित्राला आग हळूहळू आपल्या कवेत घेत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच विद्युत वितरण कंपनीचे निखिल दातीर, महेश कडू, अरविंद सतीमेश्राम यांनी अग्निशमन विभागाला माहिती देत. तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.