मिहानमध्ये तारांकित हॉटेलची उभारणी होणार! ‘इंडिया सफारी’ला एमएडीसीकडून ६.७९ एकर भूखंडाचे वितरण

वर्धा : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर तारांकित हॉटेल उभारण्यासाठी नागपूरच्या इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. या कंपनीला ६.७९ एकर भूखंडाचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे अपेक्षित असून विदर्भातील रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील सेक्टर 22 मध्ये 27 हजार 490 चौ.मि. (6.79 एकर) क्षेत्रफळाच्या या भूखंडासाठी एमएडीसीने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यास अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. कंपनी सेक्रेटरी विभागाकडून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर प्रथम क्रमांकाच्या निविदाधारक इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. यांना हे वितरण मंजूर करण्यात आले. एमएडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी या वितरणास मंजूरी दिली आहे. याबाबचे स्वीकृती पत्रही या कंपनीला पाठविण्यात आले आहे.

या भूखंडासाठी सहा हजार 325 रुपये प्रती चौ.मि. एवढी राखीव किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र, इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. कंपनीने 7 हजार 99 रुपये प्रती चौ. मि. इतके दराने बोली लावली होती. दुसरी बोली आभा हॉस्पीटॅलीटी प्रा. लि. ने 6 हजार 335 रुपये प्रती चौ. मि. या दराने बोली लावली होती. या भूखंडासाठी जवळपास 20 कोटी रुपये मुल्य आकारणी झाली आहे. गेल्या काही महिन्यात एमएडीसीकडून आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंट टेक्नॉलॉजिस, एव्हिएशन क्षेत्रातील कल्पना सरोज एव्हिएशन, कृषी क्षेत्रातील कॉसग्रो ॲग्रो, आरोग्य क्षेत्रातील अंजली लॉजिस्टीक आणि आता इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस या हॉटेल उद्योगातील संस्थेला भूखंड देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here