
वर्धा–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पवनार परिसरातील सक्षम स्कूलजवळ शनिवार (ता. १३) पहाटे एक भीषण अपघात घडला. नांदेड येथून साखरेच्या गोण्या घेऊन नागपूरकडे जाणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाल्याने रस्त्यालगत असलेले लोखंडी कठडे तोडत थेट डिव्हायडरवरून विरुद्ध दिशेला जाऊन रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन आढळला यामध्ये महामार्गालगत लागून असलेल्या लोखंडी कठड्यांचे पूर्णपणे नुकसान झाले तसेच ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
एन.एल. 01 ए.एफ. 4399 क्रमांकाचा हा ट्रक भरधाव वेगाने नागपूरकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने प्रथम महामार्गालगतचे लोखंडी संरक्षक कठडे तोडले आणि नंतर डिव्हायडर उडवत विरुद्ध बाजूला जाऊन खड्ड्यात येऊन आदळला. यावेळी ट्रकचे चालक मालक बालाजी केंद्रे त्यांच्यासोबत ट्रकमध्ये वाहकही होता. सुदैवाने या अपघातात चालक व वाहक दोघेही पूर्णपणे बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताच्या वेळी महामार्गावर इतर कोणतीही वाहतूक नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
मात्र या अपघातात महामार्गावरील लोखंडी कठडे, डिव्हायडर तसेच ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महामार्ग यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. ट्रक हटविण्याचे काम सुरू होते. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी चालकाने सांगितल्याप्रमाणे ट्रकचे स्टिअरिंग फ्री झाल्याने वाहन नियंत्रणाबाहेर गेले होते ट्रकचे ब्रेखी काम करत नसल्याने हा अपघात घडला. या घटनेनंतर यवतमाळ–नागपूर महामार्गावरील रात्रीच्या वेळी जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


























































