
वर्धा : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेंतर्गत गुरुवारी (दि.२२) अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली. कानगाव येथे गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्याकडून तब्बल ७४ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा कानगाव येथे राहणारा पुंडलिक पळसराम निमसडकर हा गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याच्या राहत्या घरी छापा टाकला असता, आरोपी गांजा विक्री करताना रंगेहाथ आढळून आला.
या कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून १ किलो १७७ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, गांजा विक्रीतून मिळालेली ४० हजार ९०० रुपयांची रोकड, मोबाईल फोन असा एकूण ७४ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान हा गांजा आरोपी सैदु शहा, रा. इतवारा, वर्धा याने पुरविल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध अल्लीपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक , अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले आणि अभिषेक नाईक यांनी सहभाग घेतला.




























































