
पवनार : सर्वोदयाच्या विचारांनी आयुष्य समर्पित केले, अहिंसेच्या मार्गाने समाजपरिवर्तन घडवले आणि पदयात्रेतून देशाच्या कानाकोपऱ्यात माणुसकीची बीजे रोवली… आचार्य विनोबा भावे यांचे निकट सहकारी व स्वीय सहाय्यक आचार्य बालविजयजी यांचे वयाच्या शंभरीत ब्रह्मविद्या मंदिर पवनार येथे निधन झाले. त्यांच्या जाण्याने सर्वोदय चळवळीतील एक जिवंत दुवा हरपला आहे.
भंडारा येथे २६ फेब्रुवारी १९२६ रोजी जन्मलेल्या बालविजयजींच्या आयुष्याला १९५३ मधील बिहार भूदान पदयात्रेने निर्णायक वळण दिले. आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आजीवन ब्रह्मचर्य स्वीकारले आणि स्वतःला सर्वोदय चळवळीला अर्पण केले. पदयात्रेत ते विनोबांचे सावलीसारखे सहचर होते. गावोगावी पायी फिरत, लोकांशी संवाद साधत आणि भूमिहीनांसाठी जमीन मिळवून देण्याच्या ऐतिहासिक कार्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
काळाच्या ओघात ते विनोबांचे स्वीय सहाय्यक झाले. पत्रव्यवहार, प्रवास नियोजन, कार्यकर्त्यांशी समन्वय आणि चळवळीच्या धोरणात्मक बाबी सांभाळत त्यांनी पडद्यामागे राहून मोठे योगदान दिले. भूदान, ग्रामदान, संपत्तीदान, सर्वोदय पत्र, शांतीसेना, आचार्यकुल, खादी मिशन आणि गो-रक्षा सत्याग्रह या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
सन १९९८ मध्ये मध्यप्रदेश शासनाचा ‘महात्मा गांधी पुरस्कार’ आणि ‘महाप्राण अहिंसा प्रशिक्षण’ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. मात्र, त्यांनी सर्व पुरस्कारांची रक्कम सामाजिक संस्थांना अर्पण करत साधेपणाचा आदर्श जपला. पवनार येथील ब्रह्म विद्या मंदिर पवनार हेच त्यांचे कार्यकेंद्र राहिले, जिथे त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडवले. आचार्य बालविजयजींचे जीवन हे शांततेतून घडवलेल्या परिवर्तनाचे प्रतीक होते. त्यांच्या जाण्याने पवनारच्या भूमीत एक दीप मालवला असला, तरी त्यांच्या विचारांचा प्रकाश समाजाला दिशा देत राहील.
पडद्यामागचा कणा…
आचार्य बालविजयजी हे सर्वोदय चळवळीचे ‘पडद्यामागचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जात. चळवळीचे नियोजन, कार्यकर्त्यांचे जाळे उभे करणे, गावागावांत संवाद साधणे आणि तणावाच्या प्रसंगी मध्यस्थी करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी अनेक तरुणांना प्रत्यक्ष पदयात्रेत सहभागी करून घेत प्रशिक्षण दिले. त्यांचा विश्वास होता की परिवर्तन हे आदेशाने नव्हे, तर संवाद आणि आचरणातून घडते. म्हणूनच त्यांनी कधीही पद किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता शांतपणे काम केले. त्यांची कार्यपद्धती आजही सर्वोदय कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरते.

























































