Home ◼️ संपादकीय हरणांच्या कळपासमोरून रूबाबात चालला ‘जंगलाचा राजा’ ; बोर व्याघ्र प्रकल्पातील थरारक क्षण...

हरणांच्या कळपासमोरून रूबाबात चालला ‘जंगलाचा राजा’ ; बोर व्याघ्र प्रकल्पातील थरारक क्षण कॅमेरात कैद

वर्धा : निसर्गाच्या कुशीत दडलेले अनेक अद्भुत क्षण कधी अचानक डोळ्यांसमोर उभे राहतात आणि पाहणाऱ्याला अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतात. असाच एक थरारक आणि दुर्मिळ क्षण वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात पाहायला मिळाला. जलाशयाच्या किनारी उभ्या असलेल्या हरणांच्या कळपासमोरून एका वाघाने शांतपणे, ऐटीत आणि अत्यंत रुबाबदार पद्धतीने चाल करत परिसर पार केल्याचे दृश्य अमरावती येथील वन्यजीव छायाचित्रकार अमेय ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडिओ सध्या वन्यजीव प्रेमींसह सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत आला आहे.

बोर व्याघ्र प्रकल्पात सफारीदरम्यान हा दुर्मिळ क्षण अनुभवायला मिळाला. जलाशयाच्या परिसरात काही हरणे सावधपणे उभी असताना अचानक जंगलातून एक वाघ बाहेर येताना दिसला. शिकारीच्या तयारीतील आक्रमकता नसतानाही त्याच्या प्रत्येक पावलात जंगलाच्या राजाचा आत्मविश्वास आणि दबदबा स्पष्टपणे जाणवत होता. विशेष म्हणजे वाघाच्या उपस्थितीची जाणीव असूनही हरणांचा कळप काही अंतर राखून सावध उभा राहिल्याचे दृश्य या व्हिडिओमध्ये दिसून येते.

वन्यजीव अभ्यासकांच्या मते, जंगलातील प्राणी अनेकदा एकमेकांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून असतात. प्रत्येक वेळी वाघ शिकार करण्यासाठीच हालचाल करतो असे नसते. अनेकदा पाणवठ्याच्या परिसरात वन्यजीवांमध्ये असे नैसर्गिक सहअस्तित्वाचे क्षण पाहायला मिळतात. मात्र अशा प्रकारे अत्यंत शांत वातावरणात वाघ आणि हरणे एकाच फ्रेममध्ये दिसणे हे दुर्मिळ मानले जाते.

बोर व्याघ्र प्रकल्प हा विदर्भातील महत्त्वाच्या वनक्षेत्रांपैकी एक मानला जातो. येथे वाघांसह बिबट, अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर तसेच विविध पक्षी प्रजातींचा अधिवास आहे. मागील काही वर्षांत येथे वन्यजीवांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण समोर येत आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक आणि वन्यजीव छायाचित्रकारांसाठी बोर व्याघ्र प्रकल्प आकर्षणाचे केंद्र बनत आहे.
अमेय ठाकरे यांनी टिपलेल्या या व्हिडिओमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. निसर्गातील संतुलन, वन्यजीवांचा दबदबा आणि जंगलातील शांततेत दडलेला थरार अनुभवणारा हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!