नोकरीच्या शोधात निघालेल्या मित्रांवर काळाची झडप! एकाचा मृत्यू; दुसरा गंभीर जखमी

अल्लीपूर : नोकरीच्या शोधात सगुणा कंपनीत दुचाकीने जात असलेल्या मित्रांवर काळाने झडप घातली. भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन टँकरवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी असून सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत आहे. हा अपघात शनिवारी दुपारी हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वणी शिवारात घडला.

वैभव नेहारे (२३) असे मृतकाचे, तर मयूर कुमरे (२४), दोघेही रा. सेलू (मुरपाड) असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही एम.एच. 3४ क्यू. 3५९४ क्रमांकाच्या दुचाकीने सगुणा कंपनीत नोकरीच्या शोधात जात होते. कंपनीच्या जवळच भरधाव असलेली दुचाकी अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या एम.एच. २१ डब्ल्यू, ६४४७ क्रमांकाच्या टॅकरवर आदळली. हा टँकर नागपूर येथून हैदराबादकडे जात होता. यात वैभवचा जागीच मृत्यू झाला तर मयूर गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून जखमीस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर दुखापत असल्याने मयूरला सेवाग्राम रुणालयात हलविण्यात आले. या अपघाताची हिंगणघाट पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत शुक्ला, सौरभ गेडाम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here