टिप्परची हायड्रोलिक मशीन डोक्याला लागल्याने कामगाराचा दुदैवी मृत्यू! मृतदेह नेला कंपनीसमोर; गिमा टेक्सटाइल पार्क येथील घटना

हिंगणघाट : नादुरुस्त हायड्रा (टिप्पर) दुरुस्त करताना अचानक टिप्परचे हायट्रोलिक कामगाराच्या डोक्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गिमा टेक्सटाइल पार्क कंपनीत बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. नातेवाइकांसह कामगारांनी मृतदेह कंपनीच्या फाटकासमोर आणून ठेवत कंपनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्‍त करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. राजू श्रावण वाढई (3२) रा. हिंगणघाट असे मृत टेक्निशियनचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, वेळा येथील गिमा टेक्सटाइल्स पार्कमधील हायड्रा अचानक बंद पडला. दरम्यान, कंपनी प्रशासनाने हिंगणघाट येथून राजू वाढई या टेक्निशियनला टिप्पर दुरुस्तीसाठी बोलाविले. राजू टिप्परचे काम करत असतानाच अचानक टिप्परचे हायड्रोलिक राजूच्या डोक्यावर बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कंपनी प्रशासनाने याची माहिती राजूच्या कुटुंबीयांना तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला न देता त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. ही बाब राजूच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती होताच राजूचा मृतदेह कंपनीतील कामगारांनी तसेच त्याच्या नातलगांनी कंपनीच्या फाटकासमोर आणून ठेवला आणि जोपर्यंत कंपनी प्रशासन राजूच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणार नाही, तोपर्यंत मृतदेह कंपनीबाहेर काढणार नाही, असा पवित्रा घेतला.

याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार संपत चव्हाण कंपनी परिसरात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत कंपनी प्रशासनाशी ठाणेदार संपत चव्हाण, माजी आमदार राजू तिमांडे यांची चर्चा झाली. सकारात्मक चर्चेअंती पाच लाख रुपये मृतकाच्या कुटुंबियाला देण्याचे निश्‍चित करीत प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. सदर आर्थिक मदत कंत्राटदार किशार घुंगरूड यांच्याकडून धनादेश स्वरूपात देण्यात आली आहे. यावेळी राजू तिमांडे, नगरसेवक चंद्रकांत माळवे, प्रविण फटींग हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here