
वर्धा : तक्रार देण्यास गेलेल्या व्यक्तीस पोलिसांनी मारहाण केली असून, ‘पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमृता गजानन साखरकर यांनी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. गजानन साखरकर याला गजानन छत्रपती लांजेवार आणि गौरव लांजेवार यांनी मारहाण केल्याने गजानन साखरकर हा अल्लीपूर पोलिसात सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास तक्रार देण्यास गेला होता. अर्ध्या तासाने गजाननची पत्नी अमृता ही पोलीस ठाण्यात गेली असता, पोलीस कर्मचारी गजाननला मारहाण करताना दिसून आले. हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अमृता गजानन साखरकर यांनी तक्रारीतून केली आहे.