
सेलू : वर्धा-नागपूर महामार्गावरील केळझर येथील दप्तरी पेट्रोल पंपाजवळ उभ्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जखमी झाला. ही दुर्घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. अपघातात अभय हरिचंद्र शंभरकर (वय ४५, रा. सेलू) याचा मृत्यू झाला असून, प्रफुल सुरेश खांडेकर (वय ४०) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही बुटीबोरी येथील कामावरून दुचाकी (क्र. एमएच ३२ एएक्यू ०२९५)ने सेलूकडे परतत असताना हा अपघात घडला.
दप्तरी पेट्रोल पंपासमोर नादुरुस्त स्थितीत उभ्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवले. अभय शंभरकर यास गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला असून, या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

















































