खासदारांनी रॅलीला दिली हिरवी झेंडी! सेवाग्रामातील ‘फ्रिडम रन’ मध्ये धावले ७५ युवक-युवती

सेवाग्राम : देशाच्या स्वातत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या अनुषंगाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘फिट इंडिया, फ्रि डम रन २.०’ चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सेवाग्राममध्येही चरखा गृहापासून सेवाग्रामपर्यंत ७५ युवक-युवती धावल्यात. खासदार रामदास तडस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये ‘फ्रिडम रन’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या महात्मा गांधी आश्रमाची निवड करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्पोर्ट्स असोसिएशन आणि नेहरु युवा केंद्राच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. देशासाठी युवक हा महत्त्वाचा असल्याने तो फिट राहणे आवश्यक आहे. प्रत्येकांना स्वत: च्या आरोग्यासाठी अर्धातास काढून फिटनेससाठी दिला पाहिजे. तेव्हाच इंडीया फिट राहील, असे मत खासदार तडस यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ललिता लेकुरवाळे, युवा केंद्राचे माजी समन्वयक संजय माटे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, सतीश इंगोले, अनिल निमसडे, बडगिलवार, प्रवीण पेटे, नलिनी भोंगाडे, प्रितेश रामटेके, बाळकृष्ण हांडे आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या उपक्रमाची सुरुवात झाली. खा. तडस यांनी हुतात्मा स्मारक परिसरात निसर्ग सेवा समितीच्यावतीने वृक्षारोपण केले. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या यात्री निवास सभागृहात या कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू तर प्रमुख अतिथी म्हणून नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा, माजी समन्वयक संजय माटे, जिल्हा क्रीडा अधिकारी ललिता लेकुरवाळे, अनिल निमगडे, सतिश इंगोले, नलिनी भोंगाडे आदी उपस्थित होते.

यावेळी यामध्ये सहभागी सर्वांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा व संचालन जयश्री भोयर यांनी केले तर आभार अनिल निमगडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता नेहरु युवा केंद्राचे पर्यवेक्षक दयाराम रामटेके, अमोल चावरे, दिक्षांत टेंभरे, ऐश्र्वर्या भोयर, मृणाली बुडे तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाचे रवी काकडे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात ७५ गावातील ७५ युवक-युवतींचा सहभाग राहिला आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमाअंतर्गत २ ऑक्टोबरपर्यंत ७४४ जिल्ह्यांमध्ये ‘फ्रिडम रन’ होणार असल्याचे शिवधन वर्मा यांनी सांगितले.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here