

वर्धा : जमिनीच्या वाटपावरून सुरु असलेल्या कौटुंबिक वादाने अखेर भीषण रूप घेत सोमवारी अल्लीपूर शिवारात एका तरुणाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतः विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये साधना सुभाष मोहिजे (५५) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (२७) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या दोघांची हत्या महेंद्र मोहिजे या त्यांच्या पुतण्याने केली. महेंद्र आणि नितीनमध्ये काही दिवसांपासून शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून, तसेच जमिनी ठेक्याने लावण्याच्या कारणावरून वाद सुरु होता. हा वाद काल (ता. २७) दुपारी टोकाला गेला. रागाच्या भरात महेंद्रने हातात कुऱ्हाड घेऊन नितीन आणि त्याची आई साधना यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. नंतर महेंद्रने स्वतःही विष प्राशन केले. काही वेळातच त्याचा देखील मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांसह पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अप्पर पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करीत असून, शेजारी व नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत. या दुहेरी हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.