सेलुतील जुगार अड्डयावर छापा! १६ जुगाऱ्यांना बेड्या; गुन्हे शाखा व सेलू पोलिसांची कारवाई

सेलू : शहरातील बंद असलेल्या चित्रपटगृहाच्या परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारुन तब्बल १६ जुगाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून १५ हजार ६७० रुपयांची रोख रक्कमही जप्त करून ताशपत्ते आणि इतर साहित्य हस्तगत केले. स्थानिक गुन्हे शाखा आणि सेलू पोलिसांकडून संयुक्तरीत्या ही कारवाई २८ रोजी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये वसीम इर्शाद शेख रा. केळझर, आशिष भरत नेहारे रा. केळझर, अक्षय राकेश रंगारी, आकाश आनंद दाभाडे, विनोद अशोक सावरकर, मंगेश सुरेश बोकडे, अनिकेत अशोक वागोदे, हर्षल ज्ञानेश्‍वर नखाते रा. सेलू, राजेंद्र रामदास कांबळे रा. मोर्चापूर, सचिन अशोक लाखे रा, सेलू, शुभम विजय धोंगडे रा. वडगाव, अनिकेत राजू साठवणे रा. सेलू, सतीश नामदेव साठवणे, अमोल लक्ष्मण बावणे रा. वानरविहरा, अमन भास्कर साठवणे रा. सेलू, इम्रान ऊर्फ इरफान कलाम शेख रा. केळझर यांचा समावेश आहे.

सेलू येथील बंद असलेल्या जैस्वाल चित्रपट ग्रुहाच्या आवारामध्ये जुगार भरविण्यात आल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सेलू पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत गुन्हे शाखेचे पोलीसही सेलूमध्ये पोहोचले. त्यानंतर सेलू पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्‍त कारवाई करून जुगार अड्ड्यावर छापा मारला. या दरम्यान, १६ जुगारी जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करून या सर्व जुगाऱ्यांकडून १५ हजार ६७० रुपयांची रोख रक्‍कम हस्तगत करून जुगाऱ्यांविरोधात सेलू पोलिसात गुन्हा दाखल केला. सेलू परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार भरविला जात असल्याने पोलिसांनी कारवाईचा धडाका लावण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here