
तळेगाव : येथील काकडदरा वाॅर्ड क्रमांक ५ मधील झोपडपट्टीतील मोहंमद रफिक मोहंमद शब्बीर यांच्या किराणा दुकानाला रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत संपूर्ण दुकान व फ्रीज, किराणा साहित्य जळून खाक झाले. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दुकानाला आग लागल्याचे परिसरातील नागरिकांना कळताच आगीची माहिती दुकानापासून काही अंतरावर रहात असलेले दुकान मालक मोहंमद रफिक मोहमंद शब्बीर यांना देण्यात आली. नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु, तो पर्यंत आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची तक्रार तळेगाव पोलिस स्टेशनला दिली असून पोलिसांनी घटनेची नोंद केली. तलाठी महेश काबरे व त्यांचे सहकारी प्रफुल्ल भोगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली व पंचनामा करुन अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.