बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह! खड्ड्यातील पाण्यात होता पडून; पोलिसात दिली होती तक्रार

वर्धा : तब्बल १६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय मागील असलेल्या मुलींच्या वसतिगृह समोरील सुरु असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे. संजय रमेश जांजरे रा. गांजरे लेआऊट असे मृतकाचे नाव आहे.

संजय जांजरे हा २ ऑक्टोबर रोजी घरातून बाहेर गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला अखेर कुठेही ते मिळून न आल्याने मुलगा अभिजीत गांजरे याने रामनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. पोलीस संजयचा शोध घेत असतानाच तब्बल १६ दिवसांनंतर रविवारी १७ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या मागे सुरु असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यातील पाण्यात तरंगताना आढळून आला.

मुलगा अभिजीतने मृतदेहाची ओळख पटवून ते वडील असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. तोल गेल्याने संजय खड्ड्यात पडला असून खड्ड्यातील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून रामनगर पोलिसांनी मृत्यूची नोंद घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here