
वर्धा : मुलगा पंकज आणि पूजा शेंद्रे यांचे रीतिरिवाजाने लग्न झाले असून, त्यांनी चांगला संसार चालवावा, अशीच माझी नेहमी इच्छा आहे. मात्र, मुलाच्या चुकीचे मी कधीच समर्थन केले नाही, करणार नाही. पंकज आणि पूजाच्या लग्नात माझ्या काही विरोधकांनी उडी घेऊन मीठ चोळण्याचे काम केले. मुलगा म्हणून पंकजचे आणि माझे कधीच पटले नाही, २० जून, २०२० मध्येच नोटरीकडून आममुखत्यारपत्र तयार करून, पंकजला माझ्या संपत्तीतून बेदखल केले. पंकजच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला बदनाम करण्याचा डाव विरोधकांनी आखला, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार रामदास तडस यांनी शनिवारी पत्रपरिषदेतून केला.
ते पुढे म्हणाले की, पंकज आणि पूजा शेंद्रे यांनी ६ जून, २०२० मध्ये वैदिक पद्धतीने विवाह केला. मुलाच्या लग्नाची घरातील सदस्यांना माहितीही नव्हती. तेव्हापासून दोघांत अनेकदा घरगुती वाद झाले. दोघांनी लग्न केले, हे मला काही दिवसांनी कळले, विरोधकांनी घर जोडण्यापेक्षा घर तोडण्याचे काम केले. पूजाची सार्वजनिक पद्धतीने विवाह करण्याची इच्छा होती. मात्र, कोरोनामुळे ते शक्य नव्हते.
अशातच दोघांत नेहमी वाद व्हायचे. अचानक चार ते पाच दिवसांपूर्वी पंकज आणि पूजाच्या विवाहाला राजकीय स्वरूप निर्माण झाले. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांनी प्रकरण उचलून धरले आणि अखेर पूजाच्या इच्छेनुसार दोघांचाही विवाह रीतिरिवाजानुसार पार पडला. या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न केला. माझा याच्याशी काहीही संबंध नाही. मुलगा पंकज माझ्याजवळ राहतही नाही. मला बदनाम करण्याचे काम विरोधकांनी केले. दोघांच्या लग्नाला घरातील एकाही सदस्याची उपस्थिती नव्हती. पंकजने लग्नाचा निर्णय स्वत:हून घेतल्याचे खासदार तडस यांनी सांगितले.
















































