

सेलू : रात्री चिमुकली गाढ झोपेत असताना अचानक चिच्या मानेजवळ साप गुंडाळी मारुन असल्याचे दिसल्याने सर्वांचीच भांबेरी उडाली. तालुक्यातील झडशी गावाजवळच्या बोरखेडी कला येथे ही थरारक घटना शुक्रवार (ता. १०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अंगावर काटे निर्माण करणारी ही घटना आहे.
मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक नागाच्या फुसकारण्याचा आवाज आला, आणि शेजारी झोपलेले वडील जागे झाले अचानक घरात जमिनीवर झोपलेल्या मुलीच्या गळ्यात गुंडाळलेला नाग पाहून पालकांचीही भंबेरी उडाली. बाजूलाच झोपून असलेल्या आईला उठवून शेजाऱ्यांना बोलविण्यात आले.
गळ्याला साप गुंडाळून असल्याचे पाहून अनेकांना काहीच सुचेनासे झाले झोपेत असणाऱ्या मुलिचे डोळे उघडले. पण पालकांनीच तिला ‘हलू नको बेटा स्तब्ध रहा ! ‘ असाच सल्ला दिला. मुलगी घाबरली नाही व शांत पडून राहीली. रात्रीत लगेच सर्पमित्रांना बोलविण्यात आले. रात्री बारा वाजता गड्याला गुंडाळी घालून असणारा साप मध्यरात्री दोन वाजेपर्यंत राहिला. अखेर असह्य झाल्यावर मुलीने हालचाल केली आणि सापाने दंश केला. सर्पमित्र तेथे पोहचल्यावर मात्र दिवाण खाली जाऊन तो साप दिसेनासा झाला.
झोपेत असणाऱ्या मुलीच्या गळ्यात साप गुंडाळण्याच्या घटनेने बोरखेडी परिसरात चांगलीच चर्चा आहे. सर्पदंश झालेल्या दिव्यांनी पद्माकर गडकरी या सात वर्षीय मुलीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.