
पुलगाव : विरुद्ध दिशेने सुसाट येणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात रोहण्यातील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात खातखेडा ते नाचणगाव रस्त्यावर ५ रोजी रात्रीच्या सुमारास झाला. पोलिसांनी मालवाहू वाहनचालकास अटक करून गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. किशोर नामदेव उईके (४०) आनंद किसन पारिसे (३५) (दोन्ही रा. रोहणा) असे मृतकाचे नाव आहे.
किशोर उईके आणि आनंद पारिसे हे दोघेही एम.एच.३२ ए.एम.३२०६ क्रमांकाच्या दुचाकीने पुलगाव नजीकच्या खातखेडा येथे घरगुती कार्यक्रमाला गेले होते. सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपून ते रोहणा येथे जाण्यासाठी निघाले. गावाला ‘पोहचणार तेवढ्यात समोरून भरधाव आलेल्या एम.एच.२९ टी.४०६५ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने दुचाकीला समोरून जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर काही दूर फरपटत गेले. जवळच असलेल्या ज्ञानभारती कॉन्व्हेंटमधील नागरिकांनी अपघाताची माहिती पुलगाव पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मते हे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी पोहोचले.
जखमींना पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेले. डॉक्टरांनी जखमींची तपासणी केली असता किशोर उईके याला मृत घोषित केले तर आनंदला पुढील उपचारार्थ सावंगी येथील रुग्णालयात रेफर केले, मात्र, उपचारादरम्यान दि. ६ रोजी पहाटेच्या सुमारास आनंदचा मृत्यू झाला. पोलिसांनी मालवाहू वाहन जप्त करून चालक तुषार गवारकर (२०, रा. सोनोरा ढोक) याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

















































