सराईत गुन्हेगाराकडून श्वानावर चाकूहल्ला! सपासप वार करीत केले ठार; झटपटीत श्वानमालक जखमी, पोलिसांकडून शोध सुरू

वर्धा : हातात चाकू घेऊन दहशत पसरविणाऱ्यास हटकले असता संतापलेल्या सराईत गुन्हेगाराने चक्क त्या व्यक्तीच्या घरात बळजबरीने प्रवेश करुन घरात भुंकणाऱ्या श्वानावरच चाकूने सपासप वार करीत जिवानीशी ठार मारले. ही अमानुष घटना सालोड हिरापूर येथे मंगळवारी १ जानेवारी रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले. यात श्वानाला वाचविण्याच्या झटपटीत श्वानमालकही गंभीर जखमी झाला हे विशेष.

आरोपी अफसर खान, रा. शनिमंदिर, सालोड हा परिसरात चाकूचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरवित होता. जोरजोरात आरडाओरड करून शिवीगाळ करीत होता. दरम्यान त्याच परिसरातील रहिवासी सचिन जिंदे याने आरडाओरड करण्यास हटकले. आपल्याला का हटकले याचा राग मनात धरून चिडून जात संतापलेल्या ‘अफसर’ने सचिन जिंदे याच्या घरात बळजबरीने प्रवेश करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देऊ लागला.

दरम्यान सचिनच्या मालकीचा श्वान आरोपी अफसर याच्यावर भुंकायला लागला. श्वान भुंकल्याने संतापलेल्या अफसरने श्वानावर चाकूने सपासप वार करीत त्याचा कोथळाच बाहेर काढून जीवे ठार मारले. श्वानाला वाचविण्यासाठी सचिनने केलेल्या झटपटीत त्याच्या पायाला गंभीर मार लागला. रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडून असलेल्या श्वानाला पाहून अफसर खानने तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखेडे, राजू वैद्य यांनी घटनास्थळी जात पाहणी करुन पंचनामा करीत आरोपीविरुद्ध कलम ३२४, ४५२, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट तसेच प्राण्यांचा छळवणूक प्रतिबंधक अधिनियम कलम ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here