Home ◼️ संपादकीय संभाजी ब्रिगेडच्या साखळी रक्तदान उपक्रमाने गाठला ५५० चा टप्पा ; तीन वर्षांची...

संभाजी ब्रिगेडच्या साखळी रक्तदान उपक्रमाने गाठला ५५० चा टप्पा ; तीन वर्षांची अखंड वाटचाल ! सामाजिक बांधिलकीचे सर्वोत्तम उदाहरण

वर्धा : संभाजी ब्रिगेड वर्धा जिल्हा आणि इंजि. तुषार उमाळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या अविरत साखळी रक्तदान उपक्रमाने आज ५५० व्या रक्तदात्याची नोंद करत एक महत्वाचा मैलाचा दगड गाठला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सलग सुरू असलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील रक्ताच्या तुटवड्यावर प्रभावी मात होण्यास मोठी मदत होत आहे.

संविधान दिनानिमित्त कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटनेचे सचिव विजेंद्र नाईक यांनी रक्तदान करून उपक्रमातील ५५० वे रक्तदाता होण्याचा मान मिळवला. त्यांच्या योगदानामुळे उपक्रमाच्या सातत्यपूर्ण वाटचालीला नवीन ऊर्जा मिळाली असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपक्रमाच्या सुरूवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना तातडीच्या रक्ताची गरज भासल्यास स्वयंसेवकांकडून त्वरित रक्तदाते उपलब्ध करून दिले आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर रक्त मिळविण्यासाठी होणारा अतिरिक्त खर्चाचा ताण कमी करण्यास या उपक्रमाचा मोठा हातभार लागत आहे.

रक्तदानाबाबत जनजागृती वाढावी आणि अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, यासाठी विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना तसेच कर्मचारी संघटना यांचा सक्रीय सहभाग मिळत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. युवकांमध्ये रक्तदान संस्कृती रुजविण्यासाठी स्वयंसेवकांकडून सातत्याने प्रचार व जनजागृती मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील एकाही रुग्णाला रक्ताच्या अभावी जीव गमवावा लागू नये या उद्दिष्टाने उपक्रम आणखी मजबूत करण्याचे नियोजन असल्याचे संभाजी ब्रिगेड व इंजि. तुषार उमाळे मित्र परिवार यांनी सांगितले. आगामी काळात प्रत्येक तालुक्यात सशक्त रक्तदाता जाळे उभे करण्यावर भर दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!