
नाशिक : दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. एका खाजगी शिकवणीच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून परतत असताना विद्यार्थ्यांसह पालकांची कार थेट विहिरीत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात ७ विद्यार्थी आणि २ पालकांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील दरगोडे कुटुंबासह काही विद्यार्थी दिंडोरी शहरात आयोजित खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलन व गुणगौरव कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सर्वजण कारने (क्र. MH15-JS-1053) आपल्या गावी परतत होते.
याचदरम्यान, शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या राजू राजे यांच्या मालकीच्या पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत कार अचानक कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकही दाखल झाले.
विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने आणि परिसरात अंधार असल्यामुळे बचावकार्याला अडथळे येत होते. अखेर तीन हायड्रा क्रेनच्या सहाय्याने मध्यरात्रीच्या सुमारास कार विहिरीबाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ बचावकार्यात अडथळे निर्माण झाले होते.
कार बाहेर काढल्यानंतर त्यामधील सर्व ९ जणांचा गुदमरून व बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या भीषण घटनेत एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने इंदोरे गावासह संपूर्ण दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.



























































