शहरातील १७ हजार कुटुंबीयांना वर्धा नगरपालिका करते पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा! पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी; पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा

वर्धा : शहरातील सुमारे १७ हजार कुटुंबीयांना वर्धा नगरपालिका प्रशासन पाणीपुरवठा करीत असले तरी अनेक व्यक्ती पिण्यायोग्य पाण्याचा गैरवापर करीत असल्याचे चित्र बघावयास मिळते. सध्या पेट्रोलने शंभरी पार केली असून, प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास भविष्यात पाणी पेट्रोलपेक्षाही महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहरातील तब्बल १७ हजारांहून अधिक कुटुंबीयांना वर्धा नगरपालिका प्रशासन पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करते. वर्धा शहरात एकूण १९ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी प्रत्येक कुटुंबाला किमान ७७५ लीटर पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर शहरातील विविध भागांत घरगुती विहिरी तसेच मोठ्या प्रमाणात बोअरवेल आहेत. चिल्ड वॉटरच्या नावाखाली पाणी भरलेली एक लीटरची बाटली बाजारपेठेत किमान २० रुपयांना विक्री केली जात आहे. उपलब्ध पाण्याचा अतिरेकी वापर होत पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यास पिण्याचे पाणी पेट्रोलपेक्षा महाग होण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा जिल्ह्यावर भीषण जलसंकट ओढावले होते. त्या वेळी महाकाळी येथील धाम प्रकल्पातून मृत जलसाठ्याच्या जोरावर वर्धा शहरासह वर्धा शहराशेजारील ११ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील नागरिकांची तृष्णातृत्पी वर्धा पाटबंधारे विभागाने केली. त्या वेळी धाम प्रकल्पाच्या उंचीवाढीसह धाम गाळमुक्त करण्याचा विषय पुन्हा एकदा बहुचर्चीत ठरला. तर सध्या धाम प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा असला तरी प्रत्येक नागरिकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे. शासनस्तरावरही नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे याचे प्रत्येकाने गांभीर्य लक्षात घेवून कृती केली पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here